औरंगाबाद – ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य सय्यद मतीन यांनी महानगर पालिका हद्दीतील भटक्या कुत्र्यांचा मुद्दा स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केला आहे. भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना आणि मलाही रस्त्यावरुन फिरताना भीती वाटते, असे त्यांनी स्थायी समिती सभापतींच्या निदर्शनास आणून दिले. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मतीन यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. स्थायी समितीच्या बैठकीतील त्यांच्या उपस्थितीमुळे महानगर पालिकेत चर्चेला उधान आले होते.
कोण आहेत सय्यद मतीन
माजी पंतप्रधान अटलबिहारी
वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास नकार देऊन मतीन राज्यात चर्चेत होते. महानगर
पालिकेच्या सर्वसाधारण सभेत वंदे मातरम गीत गाण्यासही त्यांचा विरोध राहिलेला आहे.
२० ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत येण्यास मतीन यांना सुरक्षा रक्षकांनी
रोखले होते. महापौर नंदकुमार घोडेले यांच्या आदेशाने सुरक्षा रक्षकांनी मतीन यांना
रोखले असल्याचे कळते.
माजी पंतप्रधान अटलबिहारी
वाजपेयी यांचे याचवर्षी १६ ऑगस्टरोजी निधन झाले. १७ तारखेला महापालिकेच्या
सर्वसाधारण सभेत वाजपेयींच्या श्रद्धांजलीचा ठराव मांडण्यात आला होता. बाबरी
पाडणाऱ्या वाजपेयींना श्रद्धांजली वाहणार नसल्याचे सांगत मतीन यांनी ठरावाला विरोध
केला होता. तेव्हा सभागृहा रणकंदन माजले होते, याचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्राने
पाहिले होते.
स्थायी समितीच्या बैठकीत
कुत्र्यांवर चर्चा
महानगर पालिकेच्या स्थायी
समितीची शुक्रवारी (ता. २) बैठक झाली. यावेळी स्थायी समिती सभापती राजु वैद्य यांनी
रस्ते, पाणी, कचरा या महत्त्वाच्या विषयांना फाटा देऊन सभा तहकूब केली. विशेष
म्हणजे शहरातील दीडशे कोटींच्या रस्त्यांबाबत तातडीने निर्णय घ्या असे कोर्टाचे
आदेश असताना स्थायी समितीच्या बैठकीत हवा-पाणी आणि कुत्र्यांवर चर्चा होताना
दिसली.
शहरातील भटक्या कुत्र्यांचा
मुद्दा नगरसेविका स्वाती नागरे यांनी उपस्थित केला. भटक्या कुत्र्यांचा मुद्दा
उपस्थित होताच एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन या चर्चेत हिरीरीने सहभागी झाले. शहरात
भटके कुत्रे वाढले असल्याचे ते म्हणाले. भटके कुत्रे दिवसभर रस्त्यावर फिरत असतात,
त्यामुळे वाहनचालकांना विशेषतः दुचाकी आणि पादचाऱ्यांना त्यांच्यापासून जाताना
भीती वाटते असे नगरसेवकांनी सभापती वैद्य यांच्या निदर्शनास आणून दिले. नगरसेवक
मतीन म्हणाले, भटके कुत्रे फक्त दिवसाच त्रासदायक नाही, तर रात्रीच्या वेळी
प्रत्येक व्यक्तीच्या ते अंगावर धावून जातात.
महानगर पालिकेतील
महत्त्वाचे आर्थिक विषयांवर स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा होणे आपेक्षित असताना
नगरसेवक हवापाणी आणि भटक्या कुत्र्यांवर कोरडी चर्चा करत होते. वार्डांमध्ये
विकासकामे खोळंबलेली राहात असल्यामुळे नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे
जावे लागत असल्याचे नगरसेवकांनी ‘सांजवार्ता डिजीटल’सोबत बोलताना सांगितले.











